प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरात आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकामे सुरु असताना प्रशासनाकडून या बांधकामावर कारवाई करण्यापेक्षा या बांधकामांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर देखील भूमाफियाचे अतिक्रमण सुरु आहे. मोकळ्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या झोपड्या सुरुवातीला उत्तर भारतीय कामगारांना तात्पुरत्या स्वरुपात राहण्यासाठी देत या जागेवर भूमाफियाकडून अतिक्रमण केले जात असताना एमआयडीसी कडून या झोपड्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
कल्याण डोंबिवली शहरात पालिकेच्या आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकामे वेगाने केली जात असून बैठ्या चाळी उभारण्या ऐवजी या भूखंडावर भल्या मोठ्या इमारती उभारल्या जात आहेत. पालिका अधिकार्याच्या आशीर्वादाने सुरु असलेल्या या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी १६ डिसेंबर रोजी दिले होते. या आदेशात त्यांनी शहरातील २० हजार अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी ३ महिन्याचा कालावधी देतानाच यापुढे शहरात एकही अनधिकृत बांधकाम होणार नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रभाग क्षेत्र अधिकार्यावर सोपवली होती. प्रत्यक्षात पालिकेने जाहीर केलेल्या इमारतीपैकी जवळपास ९० टक्के इमारती डौलाने उभ्या असून दुसरीकडे जागा दिसेल तिथे अनधिकृत बांधकाम वेगाने फोफावत आहे. या वाढत्या अनधिकृत बांधकामाना मुलभूत सुविधाचा तुटवडा जाणवत असून अनेक भागात पिण्यासाठी देखील पाणी मिळत नसल्याने नागरिकाचे हाल होत आहेत. एकीकडे पालिका प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामाची पाठराखण होताना दुसरीकडे एमआयडीसी देखील आपल्या राखीव भूखंड भूमाफियांना दान करत असल्याचे चित्र आहे.
डोंबिवली एमआयडीसी मधील सर्व्हिस रोडवर हाय टेन्शन वायर खाली असलेल्या एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत झोपड्या वेगाने उभ्या राहत आहेत. हि जागा गिळंकृत करण्यासाठी भूमाफियाकडून या भूखंडावर झोपड्या बांधून अतिक्रमण करत गरीब नागरिकाची फसवणूक सुरु आहे. मात्र एमआयडीसी प्रशासन डोळ्यावर झापड बांधून याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकाकडून केला जात आहे.याच जमिनी खालून उच्च दाब पेट्रोलियम उत्पादन पाइपलाइन आणि बाजूने पाण्याच्या मोठ्या पाइपलाइन जातात. ही मोकळी जागा एमआयडीसीच्या मालकीची असून हाय टेन्शन वायर खालील अशा काही जागा तात्पुरत्या भाडे तत्वावर झाडे लावणे, उद्यान करिता संस्थांना देण्यात येतात. इथे मात्र या जागेवर अतिक्रमण सुरु असताना प्रशासनाकडून या भूमाफियांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप स्थानिक संस्थाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान याबाबत एमआयडिसीचे कार्यकारी अभियंता आर पी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या झोपड्या बाबतची तक्रार प्राप्त झाल्याने तातडीने सर्व्हे करण्याचे निर्देश संबधित अधिकार्यांना देण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगत कमेऱ्या वर बोलण्यास नकार दिला आहे
