जनतेज न्युज

आंब्याच्या हंगामात गावरान आंब्याच्या गोडीची जिल्ह्यातील नागरिकांना लालसा

प्रतिनिधी, औरंगाबाद : आंबा या फळाचं नाव घेताच नक्कीच तोंडाला पाणी सुटल्या वाचून राहात नाही. आंब्याची गोडी सर्वांनाच भुरळ घालणारी असल्याने म्हणूनच आंबा या फळाला “फळांचा राजा” म्हणून दर्जा मिळतो आणि त्यात अस्सल गावरान आंब्याचा रस आणि कैरीची चव आणखीनच न्यारी. गावरान आंबा बाजारस्पर्धेत टिकत नसल्याने शेतकऱ्यांनी गावरान आंब्याच्या क्षेत्राकडे फिरवली पाठ. सध्या आंब्याचा हंगाम चालू झालेला असल्याने जून महिन्यात बाजारात आंब्याची आवक येणार असल्याने नागरिकांना आम्ररसाची आणि कैरीची ओढ आतुर करत असून गावरान आंबा विक्रीस कधी येईल याकडे नागरिकांचे डोळे वटारून आहेत. मात्र औरंगाबाद जिल्ह्याकडे कटाक्ष टाकल्यास दिवसेगनिक गावरान आंब्याच्या लागवडीचे कमी होत चाललेले क्षेत्र नागरिकांना गावरान आंब्याची गोडी चाखणाऱ्या आशेची हिरमोड करणारे ठरणार असे चित्र जिल्ह्यात प्रत्ययास येत आहे. जिल्ह्यातील शेतकरी अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या हापूस, केशर,तोतापुरी, लालबाग, बदाम, या संकरित आम्रवृक्ष लागवडीकडे वळत असल्याने शेतातील गावरान आंब्याच्या आमराई नामशेष होण्याच्या वळणावर आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा शेतात खुलून दिसणारे भव्य डेरेदार गावरान आंब्याचे झाडं क्वचितच पहावयास मिळत असल्याने  जिल्ह्यातील बाजारपेठेत गावरान आंब्याची आवक निश्‍चितच कमी होणार असे वास्तव दर्शी चित्र निर्माण होत असल्याने गावरान आंब्याची गोडी नागरिकांना चाखायला मिळणार का? असा सवाल निश्चितच गावरान आंब्याची भुरळ असणाऱ्या नागरिकापुढे उपस्थित होत आहे.