प्रतिनिधी , मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लवकर निर्णय घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत आज राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं की, “जो प्रस्ताव आम्ही दिला होता त्यासंबधी राज्यपालांना पुन्हा पत्र दिलं आहे. यावेळी बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळदेखील उपस्थित होते.
याप्रसंगी जयंत पाटील यांनी सांगितलं की, राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांना आम्ही ९ एप्रिल रोजी पत्र पाठवल होतं. विधानपरिषदेच्या ज्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या त्यासंदर्भात ते पत्र होतं. दरम्यान आम्हाला राज्यपालांकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्यामुळे, काल पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत निर्णय घेऊन आम्ही स्मरणपत्र पाठवलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचं शिफारस पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे.
दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनीही उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची नियुक्ती राज्यपालांनी करायला पाहिजे, असं आमचे मत आहे. कारण तसा ठरावं मंत्रिमंडळानं मंजूर केला आहे. मंत्रिमंडळानं केलेल्या ठरावावर राज्यपालांनी कार्यवाही करणं बंधनकारक असते. राज्यपाल कोट्यातील जागा कला, साहित्य आदी क्षेत्रातील लोकांसाठी असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. त्या निकषातही उद्धव ठाकरे बसतात. उद्धव ठाकरे स्वतः मोठे छायाचित्रकार आहेत. सामनाचे संपादक होते. पण, करोनाच्या लढाईत सरकार गुंतले असताना अशा रीतीनं राज्य अस्थिर करणं योग्य होणार नाही. त्यामुळे मला खात्री आहे की, राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला होता.
याविषयी बोलताना भुजबळ पुढे म्हणाले होते की, राज्यपालांकडून असा निर्णय घेण्यात आला नाही तर, दुसरा मार्ग आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. परत आम्ही त्यांना आमचा नेता म्हणून निवडू. परत सगळं मंत्रिमंडळ शपथ घेईल आणि आपलं काम सुरू करेलं. पण, ही वेळ येऊ नये म्हणून राज्यपालांनी निर्णय घेणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.
राज्याचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks व महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मा. राज्यपाल@BSKoshyari यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या २रिक्त जागांपैकी एका जागेवर मा. मुख्यमंत्री@CMOMaharashtra यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मंत्री मंडळाची शिफारस मा. राज्यपालांकडे केली. pic.twitter.com/fe5g5uy5tV
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 28, 2020
