प्रतिनिधी , मुंबई : आझाद मैदानात मागील ८ दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील जवळपास १ हजार संगणक परिचालक आंदोलन करत आहेत. मागील १० वर्षांपासून संग्राम आणि आपले सरकार या दोन्ही प्रकल्पात प्रामाणिकपणे काम करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामावून घेऊन किमान वेतन देणे, आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात सुमारे ३९२ कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या दिल्लीच्या सीएससी-एसपीव्ही या कंपनीवर कारवाई करणे, या मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे संगणक परिचालकांचे २२ फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन रात्रंदिवस सुरू आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख असताना त्यांनी २९ नोव्हेंबर २०१८ रोजी आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या संगणक परिचालकांच्या आंदोलनाला भेट देऊन आय टी महामंडळात घेऊन किमान वेतन देण्याचे वचन दिले होते. प्रश्न सुटेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. परंतु, आज ते स्वतः मुख्यमंत्री आहेत. शिवाय त्यांच्याकडेच आय टी विभाग असताना अद्याप त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे. त्यामुळे त्यांनी लक्ष देऊन ग्रामीण भागातील संगणकपरिचालकांना न्याय दयावा अशी मागणी संगणकपरिचालक करत आहेत. अशी माहिती संगणक परिचालक संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.
