जनतेज न्युज

एका लग्नाची गोष्ट : गृहमंत्री करणार कन्यादान तर नागपूरचे जिल्हाधिकारी होणार वर पिता ..

प्रतिनिधी , नागपूर : भारतीय संस्कृतीत लग्नाच्या संकल्पनेला फार महत्व आहे. आयुष्याच्या ठराविक वळणावर आल्यानंतर वर आणि वधू यांचा लग्न सोहळा संपन्ना केला जातो. मात्र ज्याचं या जगात कुणीही नाही असे अनेक तरुण तरुणी आपल्या समाजात आहेत. त्यातही ज्यांच्या शरीरात व्यंग आहे,अश्या लोकांसाठी तर समाजातील परिस्थिती फारच कठीण आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यातील वझ्झर येथील प्रसिद्ध समाजसेवक शंकरबाबा पापडकर हे अश्या तरुणांसाठी मोठा सहारा म्हणून पुढे आले आहेत,त्यांनी अनेकांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन केले आहे,एवढंच नाही तर शंकरबाबा पापडकर यांनी दत्तक घेतलेल्या २३ मुलींचे लग्न देखील लावून दिले आहे. आता त्यांची आणखी एक दत्तक मुलगी लग्नाची झाली आहे. वर्षा असे तिचे नाव आहे,मात्र दुर्दैवाने वर्षा बोलू आणि ऐकू शकत नाही,त्यामुळे तिच्या समरूप वर शोधणे फार मोठे आवाहन होते,पण त्यांच्याच आश्रमातील समीर नावाच्या तरुणाने वर्षाचा स्वीकार केला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे वर्षा प्रमाणेच समीर सुद्धा बोलू आणि ऐकू शकत नाही. हा लग्न सोहळा जरा हटके व्हावा या करिता जय्यत तयारी सुरू झाली आहे. वर्षा आणि समीरला आई वडील नाहीत,त्यामुळे वर्षाचं कन्यादान कोण करणार हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे कन्यादान करण्यासाठी पुढे आले आहेत तर नागपूर शहराचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे हे वर पिता म्हणून कर्तव्य पार पडणार आहेत. आज पासून कौटुंबिक कार्यक्रमांना सुरवात झाली असून जिल्हाधिकारी ठाकरे यांच्या कुटुंबाने आज नवं दाम्पत्यासाठी त्यांच्या निवासस्थानी विशेष मेजवानी आयोजित केली होती.