प्रतिनिधी , मुंबई : कोरोनाव्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही सध्या गंभीर परिस्थिती आहे. या आजाराचा धोका लक्षात घेऊन बाबासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख आणि सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी घरातच सुरक्षित राहू, भीमापुढे नतमस्तक होऊ, असे सांगितले आहे.
दरवर्षी १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी होते. त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक एकत्र जमत असतात. मात्र यंदा तसं न करता आपण घरूनच बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करावे, असं आवाहन सागर देशमुख आणि आदर्श शिंदे यांनी केलं आहे.
तसेच, १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने सकाळी ११ वाजता स्टार प्रवाहवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. सध्याच्या वातावरणात हा विशेष भाग प्रेक्षकांना नक्कीच नवचेतना देईल. तेव्हा आपल्या संरक्षणासाठी घरातून बाहेर न पडता या विशेष भागाचा आनंद लुटू या आणि सरकारी सुचनांचं पालन करून कोरोनावर मात करू या, अशी भावना सागर देशमुखने व्यक्त केली.
