जनतेज न्युज

तृतीयपंथींच्या सन्मानार्थ समानतेचा दिवा

प्रतिनिधी , नागपूर : तथाकथित सुशिक्षित समाजातर्फे समानतेच्या नावाने गळे काढले जात असले तरीही याच समाजाकडून तृतीयपंथींना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. त्यांना अघोषितरित्या बहिष्कृत केले आहे. या दुतोंडी भूमिकेकडे लक्ष वेधत आज नागपूर येथील संविधान चौकात तृतीयपथींच्या सन्मानार्थ समानतेचा दिवा लावण्यात आला.
पुजा प्रमोद मानमोडे, अबोली येनुरकर, स्वाती अहीरराव, किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष राणी ढवळे, सचिव राशी कोचे, सोनू ढवळे, सीमरन ढवळे यांनी पुढाकार घेत संविधान चौकात समानतेचा नारा दिला. बॉलीवूड स्टार अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटात तृतीयपंथींना समानतेची वागणूक देण्याचा मुद्दा छेडण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. जन्मानंतर एखादी व्यक्ती तृतीयपंथी असल्याचे निदर्शनास आले तर तिला घरातून बाहेर काढण्यात येते. कुटूंब व्यवस्थेतून बेदखल करण्यात येते. अपंग किंवा मुक-बधीर बाळ जन्माला आले तर आपण त्याला प्रेमाने वाढवतो, मात्र तृतीयपंथी जन्माला आल्यास बहिष्कृत केले जाते. हा दुजाभाव समानतेच्या सिद्धांतांना धक्का देणारा आहे, अशी खंत पुजा मानमोडे व राणी ढवळे यांनी व्यक्त केली. ‘हम सब एक है तो ये भेदभाव क्यों?’, ‘आपण सारी एकाच आईची मुले तर हा भेदभाव का?’, ‘आओ मिलकर साथ चले, विषमता की दूरी मिटाए’, ‘आम्हाला सुद्धा सन्मान आणि प्रेमाची वागणूक हवी’ असा संदेश लिहीलेले फलक आंदोलनादरम्यान दाखविण्यात आले. तृतीयपंथींना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांचे अस्तित्व नाकारण्याचा अधिकार कुणालाही मिळू नये यासाठी सरकारने कायदा करावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली. दिवाळीच्या निमित्ताने लावण्यात आलेला समानतेचा दिवा अखंड ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.