प्रतिनिधी , पुणे : कोथरूड परिसरातील डावी भुसारी कॉलनीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका मतिमंद मुलींच्या संस्थेच्या दुसऱ्या मजल्यावरून उचलून खाली फेकल्या मुळे एका 33 वर्षीय मतीमंद मुलीचा मृत्यू झालाय. डावी भुसारी कॉलनीतील सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
ममता मोहन डोंगरे (वय 33) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी संस्थेतील एका 14 वर्षीय मतिमंद मुलीवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी अनिता रामकिसन टापरे (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दोन्ही मतिमंद मुली या सावली मतिमंद बहुविकलांग प्रतिष्ठान येथे राहतात. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मयत ममता डोंगरे ही संस्थेच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या जिन्यातील रॅम्पवरून चालत असताना संस्थेतच राहणारी 14 वर्षीय मतिमंद मुलगी त्या ठीकाणी आली. तिने ममता डोंगरे हिला पाठीमागून पकडले आणि उचलून दुसऱ्या मजल्यावरील जिन्यातून खाली फेकून दिले. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे आमचा डोंगरेचा मृत्यू झालाय. कोथरुड पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
