जनतेज न्युज

पहाटेचा शपथविधी सोडला तर, अजित पवार यांनी संधी असूनही कधीच स्वतःचा विचार केला नाही – शरद पवार

प्रतिनिधी , पुणे : “अजित पवारांना महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन २०-२५ वर्षे झाली आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनच काम केलं. पाठीशी विधानसभेतील बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा असतानाही असा काही विचार त्यांनी कधी केला नाही.

अनेकदा उपमुख्यमंत्रिपदाची संधी असताना त्यांनी छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील किंवा आर. आर. पाटील यांची नावं सुचवली. स्वतःला संधी असताना त्यांनी स्वतःचा विचार कधीच केला नाही.

अलीकडच्या काळात फक्त एक चुकीचं पाऊल, रागाच्या परिस्थितीत त्यांनी टाकलं होतं. त्यावर आताच्या गव्हर्नर साहेबांनी पहाटे उठून शपथ देण्याची तत्परता दाखवली. तितकं एक काम त्यांच्याकडून झालं. पण तेही त्यांच्या लक्षात आल्यानंतर ४८ तासांत त्यांनी राजीनामा देऊन चूक सुधारली, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काका शरद पवार यांनी सांगितले.

“पहाटेच्या शपथविधीच्या घटनेनंतर अजित पवार पक्षात परतले तेव्हा पक्षातील सदस्यांनी एकजीवानं काम करण्याचा आग्रह केला. त्यातूनच मग अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.

अजित पवारांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कष्ट भयंकर करतात. सकाळी ७ वाजता त्यांचं कार्यालय सुरू होतं. जास्तीत जास्त लोकांना भेटणं, प्रश्न सोडवणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. काही गोष्टी होतात. पण, जसजसं वय वाढतं, अनुभव वाढतो. तशा या गोष्टी कमी होत जातात,” असेही शरद पवार यांनी सांगितले.

एका वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत पवार बोलत होते.

विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी झाल्यात. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसून भाजपसोबतचे संबंध तोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत होती. त्या घडामोडीत शरद पवारांची मुख्य भूमिका होती. त्यातच अजित पवार यांनी एका रात्रीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवत ८० तासांची सत्ता स्थापन केली होती. परंतु असे असतानाही अजित पवार राजीनामा देऊन पक्षात परत आल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिले. तेव्हा अजित पवारांना झुकते माप का, असा प्रश्न महाराष्ट्रातील नागरिकांना पडला. त्या प्रश्नाचा उलगडा शरद पवार यांनी मुलाखतीतून केला.