जनतेज न्युज

पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा माजी महापौर भगवान करनकाळ यांचा इशारा

प्रतिनिधी, धुळे : धुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे, तसेच दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मूलभूत सुविधा पुरविण्यात मनपातील सत्ताधारी असलेल्या भाजपला अपयश आले आहे. पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी महापौर भगवान करनकाळ यांनी दिला आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पार्किंगचा आढावा घेण्यासाठी रिक्षाने धुळे शहरातील नगरपट्टी, आग्रारोड, खोलगल्ली या भागात फेरफटका मारल्याचे त्यांनी सांगितले. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मुख्य पार्किंगची बाजारपेठांच्या व्यवस्था ठिक नसल्याने वाहनचालक व व्यावसायिकांना त्रास होत आहे. धुळे महानगरपालिका आठ ते दहा दिवसांआड पाण्याचा पुरवठा करते, पाणीपट्टी मात्र पूर्ण वर्षभराची घेते, हे चुकीचे असून नागरिकांची लूट सुरू असल्याचा आरोप करनकाळ यांनी यावेळी केला.

2021-22 या आर्थिक वर्षात धुळे महानगरपालिकेने तब्बल एक कोटी रुपये इतका वृक्षकर वसूल केला आहे. पण वृक्षसंवर्धनासाठी दमडीही खर्च केलेली नाही, तसेच नवीन वृक्षांची लागवड ही केली नाही.

वृक्षसंवर्धनासाठी किती पैसे खर्च केले त्याचा तपशील देण्याचे आव्हान महापालिकेला त्यांनी दिले आहे. येणाऱ्या काळात जर धुळेकर नागरिकांच्या मूलभूत प्रश्न सोडवले गेले नाही तर महानगरपालिका विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा गंभीर इशारा माजी प्रथम महापौर भगवान करनकाळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.