जनतेज न्युज

पार्थ पवार यांनी मावळ तालुक्यात २७०० लिटर सॅनिटायझर वाटले

प्रतिनिधी , पुणे : संपूर्ण देश कोरोनाशी लढा देत आहे. जगात या विषाणूने आणीबाणीची परिस्थिती निर्माण केली आहे. देशपातळीवर व राज्यपातळीवर मदतीसाठी अनेक लहान-मोठे हात पुढे आले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीही खारीचा वाटा उचलला आहे.
मावळ तालुक्यातील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्ती, नगरपरिषद, कॅन्टोमेंट बोर्ड, पोलीस स्टेशन, सर्व ग्रामपंचायती आदींना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्याकडून २७०० लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आल्याची माहिती मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिली आहे.

त्याचबरोबर मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायत, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड, लोणावळा नगरपरिषद, देहू ग्रामपंचायत आदी ठिकाणीही प्रत्येकी १०० लिटर सॅनिटायझर व तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींपैकी छोट्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लिटर व मोठ्या ग्रामपंचायतींना २० लिटर सॅनिटायझर व तालुक्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला प्रत्येकी ५० लिटर सॅनिटायझर पार्थ यांनी वाटप केले.

मावळ तालुक्यात सॅनिटायझर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पार्थ पवार यांचे मावळवासीयांनी आभार मानले आहे. तसेच त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू व त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यकाळात अधिक गतीने काम करू, असा आशावाद राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी व्यक्त केला.