प्रतिनिधी , पुणे : आज महाराष्ट्रीयांचा महत्त्वाचा सण पोळा. महाराष्ट्रात आज (१८ ऑगस्ट) बैल पोळा (Bail Pola) सण साजरा केला जात आहे. यालाच पिठोरी अमावस्यादेखील म्हणतात. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण (Bail Pola Festival) साजरा केला जातो.
पोळ्याच्या पर्वावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी समस्त शेतकरी बांधवांना शुभेच्छा देताना, पवार म्हणाले, बैल पोळा कृषी संस्कृतीतला हा महत्त्वाचा सण आहे. राज्यावर दाटलेले कोरोना संकटाचे, निराशेचे मळभ दूर करून बैल पोळा सण निश्चितच सगळीकडे उत्साह, चैतन्य, आनंद, समृद्धी घेऊन येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे माजी कृषिमंत्री तथा राज्याच्या राजकारणात अग्रस्थानी असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बैलगाडीवरच्या फोटोला सोशल मीडियावर अधिकाधिक प्रसिद्धी मिळत आहे.
आपला माणूस या पानावर एका कार्यकर्त्याने संघर्ष योद्धा या कॅप्शनखाली हा फोटो पोस्ट केला आहे. पोळा हा सण महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यंदा कोरोनाच्या (Corona) सावटामुळे ठिकठिकाणी भरणारा पोळा रद्द करण्यात आला आहे. तसेच, तान्हा पोळ्याच्या दिवशी शहरात मारबत काढली जाते. वाईट गोष्टींना घेऊन जा असा नारा देत ही मारबत निघत असते. ती मारबतदेखील यंदा कोरोनामुळे रद्द केली आहे.
