प्रतिनिधी, बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आज अतिवृष्टी पाहणी दौरा होता. पंकजा मुंडे यांनी बीड तालुक्यातील जाधव वस्ती परिसरात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी आपबिती सांगत अक्षरशः हंबरडा फोडला, नुकसान झालेली स्थिती पाहून पंकजा मुंडे देखील काही काळ स्तब्धच राहिल्या. नुकसान झाल्यानंतर तात्काळ मदत मिळायला हवी उशीर का झाला त्याची माहिती घेऊन जाब विचारणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना देखील मदतीसाठी साकडे घालणार असल्याचं पंकजा मुंडेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
