जनतेज न्युज

भाजपची सुपारी घेऊन ओवेसी देशात हिंदू- मुस्लिमांमध्ये फूट पाडत आहेत,मेहबूब शेख यांचा आरोप.

प्रतिनिधी , ठाणे : एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी हे नेहमीच आक्रमक आणि हिंसा भडकवणारी भाषणे करीत आहेत. मात्र, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात येत नाहीत. यावरुन काय तो अर्थबोध आपण घ्यायला हवा. भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्ये एमआयएमचे लोक हिंसक भाषणे करीत आहेत. त्यानंतर दंगली भडकावल्या जात आहेत. म्हणजेच भाजपची सुपारी घेऊन ओवेसी जातीय दंगली भडकवत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला आहे. ठाणे शहरातील एनकेटी सभागृहामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष विक्रम खामकर, राष्ट्रवादीचे युवक रोजगार सेलचे ओमकार माळी,युवक प्रदेश सरचिटणीस विरु वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी शेख म्हणाले की, आपण स्वत: अल्पसंख्यांक समाजातील आहे. पण, जबाबदारीने बोलत आहे की, देशात भाजपने हिंदू-मुस्लीम धर्मियांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरु केले आहे. त्यासाठी त्यांनी एमआयएमच्या ओवेसी यांचा वापर सुरु केला आहे. ओवेसी स्वतः आणि माजी आमदार वारीस पठाण हे भाजपचे प्राबल्य असलेल्या भागात जाऊन द्वेष पसरविणारी भाषणे करीत आहेत. मात्र, हार्दीक पटेल, कन्हैय्या कुमार यांच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल करणारे केंद्रातील सरकार ओवेसी -पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करीत नाही.
यावरुन भाजप आणि एमआयएम यांची मिलीभगत असल्याचे स्पष्ट होत आहे,असा आरोप शेख यांनी केला आहे. निवडणुका आल्यावर हिंदू-मुस्लीम आणि लव्ह जिहाद असे प्रश्न निर्माण करुन धार्मिक दंगली उसळवण्याचा भाजपचा अजेंडा ओवेसी सुपारी घेऊन चालवित आहेत. आज ओवेसी हे काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लीमांना काय दिले, असे म्हणत आहेत. पण, 70 वर्षांच्या एमआयएमने आतापर्यंत ओवेसी यांनाच खासदार केले आहे. पण, 21 वर्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक मुस्लिमांना राज्यसभेत संधी दिली आहे. देशात सध्या फक्त शरद पवार हेच एकमेव टक्कर देणारे नेते आहेत. त्यामुळेच त्यांचे नाव युपीएच्या अध्यक्षपदासाठी चर्चेला आले आहे. त्यामुळे आता युवक म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. आगामी तीन महिन्यात युवकांनी घोड्यासारखे काम करुन बुथबांधणी करायची आहे. अन् येत्या २०२४ ला केंद्रातील सरकारला घोडा लावायचा आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
याचसोबत यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी, आंदोलनांमधूनच युवक घडत असतो. सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाण्याचे अध्यक्ष विक्रम खामकर हे चांगले काम करीत आहेत. पण, आपणाला केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जनजागृती करण्यासाठी आंदोलने करावी लागणार आहेत. आपले सरकार असताना आपण क्लस्टरसाठी उपोषण केले होते; मोर्चा काढला होता. त्यामुळे जनतेच्या हिताचे प्रश्न घेऊन आपण लढले पाहिजे, असे आवाहन केले आहे.