प्रतिनिधी , पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या नवव्या दिवशी म्हणजे आज पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार म्हणून अनेकांना ते काय सांगतील याची उत्सुकता लागली होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर विविध स्तरांतून काहीसे विरोधी सूर उमटल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला नेत्या रूपाली चाकणकर यांनीही मोदींच्या भाषणावर खोचक प्रश्न विचारत टीकास्त्र सोडले आहे.
रूपाली चाकणकर म्हणतात-
जनतेच्या वेदना, त्यांची आर्थिक चिंता,कोरोना विषाणूसारखे भयंकर संकट दूर कसे होईल यावर पंतप्रधान महोदय काहीच बोलत नाहीत. वैद्यकीय उपाययोजना, लॉकडाऊननंतरच्या काय उपाययोजना याविषयी बोलायचं सोडून फक्त शोबाजी करत आहेत. मोदी साहेब, आपण पंतप्रधान आहात की एव्हेंट मॅनेजर आहात? शंका वाटते, असा खोचक टोला चाकणकर यांनी लगावला आहे. सामान्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा असताना आपण काय मदत देणार आहात यावर बोलायचं सोडून काही तरी आवाहन करायचं.
मोदीसाहेब, येणाऱ्या ५ एप्रिलला दिवे पेटवून सामान्यांच्या पोटाची खळगी भरणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या सांगण्यावरून आम्ही थाळ्या वाजवल्या,आता दिवे पेटवू. फक्त तुम्ही एकदा आमच्या सांगण्यावरून व्हेंटिलेटरवर लागणारा १२ टक्के जीएसटी कमी करून कोरोनाबाधित पेशंटला दिलासा द्यावा, असंही त्या म्हणाल्या आहेत. कोरोनासारख्या महाभयानक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासीयांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी तिमिरातून तेजाकडे जाण्याचा सल्ला दिला. म्हणजे येत्या ५ एप्रिलला रात्री ९ वाजता त्यांनी घरातील लाईट बंद करून घराबाहेर किंवा बालकनीत दिवा किंवा मोबाईल टॉर्च पेटवण्यास सांगितलं, असे चाकणकर म्हणाल्या.
