प्रतिनिधी , सांगली : सांगलीवाडीचे रिक्षाचालक विजय कोळी यांनी प्रवाशाची बॅग रिटर्न करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे. यानंतर प्रवाशी कुटुंबाने रिक्षाचालकाला फुल देऊन त्यांचे विशेष आभार मानले.
सांगली खणभाग लाळगे गल्लीतील सुभाष आवळे यांची मुलगी सिंधुदुर्ग येथून नुकतीच आली. सांगली स्टँडवरून ती mh – 10 – cq- 2000 या रिक्षातून आपल्या वडीलांच्या घरी गेली. मात्र प्रवासातील थकव्यामुळे त्यांची महत्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम असलेली बॅग रिक्षातच विसरली. रिक्षाचालक विजय कोळी यांना घरी गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ लाळगे गल्लीतील प्रवाशाचे घर गाठले आणि त्यांनी सदरची बॅग त्यांच्याकडे सुपूर्त केली. विशेष म्हणजे बॅग विसरल्याची पुसटशी कल्पना नसणाऱ्या आवळे कुटुंबाला रिक्षाचालकांने स्वतःहून बॅग आणून दिल्याने सुखद धक्का बसला. त्यानंतर रिक्षाचालकाच्या या प्रमाणिकपणाचा सन्मान म्हणून आवळे कुटुंबांनी विजय कोळी आणि त्यांचे सहकारी सचिन शिंदे यांचे फुल देऊन आभार मानले. तसेच इतर रिक्षाचालकांनी कोळी यांचा आदर्श घेतल्यास प्रवाशांचा त्यांच्याप्रती असलेला विश्वास दृढ होइल अशी भावनिक उदगार सुभाष आवळे यांनी काढले आहे.यावेळी प्रभावती आवळे, सुरेखा वायदंडे आदी उपस्थित होते. एकंदर काही रिक्षाचालकांकडून अनेक प्रवाशांना मानसिक,आर्थिक त्रास झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आज विजय कोळी यांनी घडवलेले प्रामाणिकपणाचे दर्शन आशा प्रवृत्तीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही .
