गेल्या तीन वर्षापासून दिव्यांगासाठी राबविण्यात आलेली शिबिरे आणि नोंदणी याचे फलित आज दिव्यांगांना मिळाले आहे. जिल्ह्यात 12 हजारहून अधिक दिव्यांगांची नोंदणी झाली होती पैकी 8797 जणांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
प्रतिनिधी , लातुर : दिव्यांग व्यक्तींनाही सर्वसामान्याप्रमाणे जीवन जगता यावे याकरिता शासकीय स्थरावर प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंद केली जात होती. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत हे देखील ऑनलाईनद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाला साहित्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून प्रशासन राबत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती एवढेच नाही तर ग्रामपंचायत स्थरावर या दिव्यांगांची नोंद घेण्यात आली होती. जिल्ह्यात 12 हजारांची नोंद झाली होती परंतु, 8 हजार 797 दिव्यांग हे मदतीसाठी पात्र झाले आहेत. यासंबंधी जिल्हा परिषदेच्या वतीने मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आला होता.लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनीही वेळोवेळी पाठपुरावा केल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत मिळाली आहे.
