जनतेज न्युज

वर्तकनगरमध्ये गुन्हेगारांचा सुळसुळाट-पोलीस ठाण्यात सर्वपक्षीय निवेदन सादर

प्रतिनिधी, ठाणे : वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही ठिकाणी गुन्हेगारी आणि नशेडी प्रवृत्तीच्या तरुणांनी आपला अड्डा बनविला आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवाया होत असून पोलिसांनी या नशेडींवर कडक कारवाई करावी अशा मागणीसाठी वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी वर्तकनगर पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आलेले आहे. 

वर्तकनगर परिसर हा निसर्गरम्य परिसर आहे. मात्र काही महिन्यापासून या परिसरातील इमारत क्र. ५५ मागील ठामपाचे उद्यान, जानकादेवी मंदिराजवळील मैदान, रूणवाल ते लक्ष्मीपार्क रस्ता, पाडा नं. ४ पुढील मोकळे जंगल आणि उपवन, कोकणीपाडा, गावंडबाग परिसर, वर्तकनगर पाईप लाईन तसेच विजय नगर पाईप लाईन परिसरात नशेडीनी विळखा घातला आहे. तरुणांच्या टोळ्या  गांजा, गोळया, दारू सारख्या नशा कुणालाही न घाबरता खुलेआम करतात. या कशेडी तरुणांच्या वावराने वर्तकनगर परिसरात गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. त्यामुळे वर्तकनगर रहिवाशी हे धास्तावलेले आहेत. या नशाबाज तरुण हे नशेला पैसे नसल्याने गुन्हेगारी कारवाया करीत आहेत. या नशेडीना वेळीच आळा न घातल्यास गंभीर गुन्हे होण्याची शक्यता निवेदनात वर्तविण्यात आली आहे. वर्तकनगर पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवून संभावित ठिकाणी छापेमारी करून नाश आणि गुंड प्रवृत्तीच्या तरुणांची धरपकड करावी अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिवसेनेच्या नगरसेविका विमलताई भोईर यांच्या माध्यमातून वर्तकनगर पोलिसांकडे केली आहे. यावेळी नगरसेविका विमलताई भोईर यांनी सांगितले कि, शांत आणि निसर्गरम्य वर्तकनगर परिसरातील अनेक ठिकाणी अशा नशेबाज तरुणांची टोळकी दिवस रात्री जमतात त्यांच्यावर वर्तकनगर पोलिसांनी अंकुश वेळीच लावणे गरजेचे असल्याची माफक अपेक्षा व्यक्त केली.