प्रतिनिधी , यवतमाळ : विदर्भ-मराठवाडाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवर लोकसहभागातून नागरिकांनी 14 लाख रुपये खर्च करून सेतू बांधला आहे. त्यामुळे शेतकऱ्यासह नागरिकांचा प्रवास झाला सुकर झाला आहे. उमरखेड तालुक्यातील पाच गाव आणि पळशी – हादगाव तालुक्यात येणाऱ्या नऊ गावातील लोकांनी एक एक पैसा गोळा करून सेतू निर्माणसाठी श्रमदान केले. लोक एकत्र आल्यास काय घडू शकते, हा सेतू जिवंत पुरावा आहे.
पळशी मनूला गावालगत हा सेतू बांधण्यात आला आहे. पूर्वी विदर्भातील लोकांना 35 किलो मीटर अंतराचा फेरा मारून मराठवाड्यात जावे लागत होते. यामुळे वेळ आणि पैसा व्यर्थ खर्च होत होता. 35 किलोमीटर अंतराचा फेरा कमी करण्यासाठी लोक एकत्र आले. अगदी14 दिवसात लोकवर्गणी आणि श्रमदानातून हा सेतू निर्माण झाला. वाहतूक सुरू झाल्याने कमी वेळात मराठवाड्यात जाता येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे.
