प्रतिनिधी , मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाचे सदस्य नसल्याने महाराष्ट्रात मोठा घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता असतानाच आता महाविकास आघाडीकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या ९ जागांसाठी निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी आघाडीच्या तिन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून गेल्या दोन दिवसांपासून राजकीय हालचाली वाढल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या विधिमंडळाच्या एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना येत्या २८ मेच्या आधी याबाबतची पूर्तता करावी लागणार आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यानंतर राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयच्या जागेसाठी मंत्रिमंडळाने उद्धव यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची चर्चा होती. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्याअगोदर शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीचं पत्र दिलं. शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांसाठी निवडणूक घेण्याचे पत्र दिले. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनीही अश्याच मागणीच पत्र निवडणूक आयोगाला पाठवले आहे.
दरम्यान, राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवताच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणूक आयोगाला पत्र पाठवून विधानपरिषदेची निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
