प्रतिनिधी, मुंबई : शिल्लक मळीच्या साठ्याचा प्रश्न, कोव्हीड १९ विषाणूमुळे मद्याची कमी मागणी झाल्यासह येत्या हंगामात होणारी मळीची उपलब्धता यामुळे मळी निर्यातीवरील बंदी शासनाने मागे घेतली आहे. २७ डिसेंबर २०१९ला शासनाने दिलेला आदेश मागे घेतला आहे. २०१९-२० हंगामातील मळी परराज्यात आणि परदेशात निर्यात करण्यास ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुभा दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती व मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थिती विचारात घेता. मागच्या वर्षीच्या तुलनेत सन २०१९-२० यावर्षी मळीचे उत्पादन आणखी कमी होण्याची शक्यता होती. परणामी देशी, विदेशी मद्य, एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल, इथेनॉल निर्मिती आवश्यक असणाऱ्या मद्यार्कावर होण्याची शक्यता विचारात घेऊन २०१९-२० हंगामातील मळी निर्यातीवर डिसेंबर २०१९मध्ये बंदी घातली होती.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार मागील हंगामात १ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यातील साखर कारखान्यांमध्ये एकूण ३.०२ लाख मे. टन मळी शिल्लक होती. चालु वर्षी अंदाजापेक्षा जास्त म्हणजे एकूण २४.१० लाख मे.टन मळीचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे ९ जून २०२० रोजी साखर कारखान्यांकडे एकूण ८.४७ लाख मे.टन आणि राज्यातील डिस्टीलरीकडील एकूण ५.४३ लाख मे. टन मळी अशी एकूण १३.९० लक्ष मे.टन मळी शिल्लक आहे. तसेच, साखर आयुक्तांच्या अंदाजानुसार साधारणत: सन २०२०-२१ या साखर हंगामात अपेक्षित ९५० लाख मे.टन उसाचे गाळप झाल्यास या हंगामात अंदाजे ३६ ते ३८ लाख मे.टन मळीचे उत्पादन अपेक्षित आहे.
