जनतेज न्युज

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फुट काँग्रेसचे नेते, पदाधिकारी अपक्ष उमेदवाराच्या बुथवर

प्रतिनिधी , अमरावती : शिक्षक मतदार संघासाठी अमरावती विभागात आज मंगळवारी मतदान होत आहे. मात्र यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथे या निवडणुकीत महाविकास आघाडीत फुट पडली असुन स्थानिक काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एका अपक्ष उमेदवाराच्या बुथवर पहावयास मिळाले आहे. यामुळे शहरात विविध चर्चांना ऊत आले आहे.
शिक्षक मतदार संघाची निवडणुक घोषीत झाल्यानंतर राज्यात सरकार असलेले काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीतर्फे उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली. श्रीकांत देशपांडे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतांना चांदूर रेल्वे तालुक्यात या आघाडीला फूट पडल्याचे चित्र पहावायास मिळत आहे. चांदूर रेल्वेतील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते चक्क एका अपक्ष उमेदवाराच्या बुथवर पहावयास मिळाले. ही परिस्थिती नांदगाव खंडेश्वरमध्ये सुध्दा आहे. यामुळे काँग्रेसकडून याच अपक्ष उमेदवाराचा प्रचार झाल्याची चर्चा चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात रंगु लागली आहे. तर महाविकास आघाडीच्या बुथवर शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी शेवटपर्यंत बुथवर थांबून असल्याचे चांदूर रेल्वेत दिसले. या आघाडीच्या बुथवर एकही काँग्रेस नेता, कार्यकर्ता आढळून आला नाही. यामुळे अमरावती जिल्ह्यात काँग्रेस – शिवसेनेत महाविकास आघाडीत मोठी दरार निर्माण होण्याची शक्यता असुन यावर निवडणुकीनंतर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.