प्रतिनिधी , जालना : जालन्यात शिक्षकाची नोकरी करणाऱ्या एका शिक्षकाने स्वतः कडील ६ एकर शेतीला सेंद्रीय शेतीचा आधार दिला आहे.प्रकाश धानुरे असं या शिक्षकाचं नाव असून ते जालना शहरात शिक्षकाची नोकरी करतात.मात्र दुपारी शाळेला सुट्टी राहत असल्याने त्यांनी शेतीकडे अधिक लक्ष केंद्रीत केलं. सुरुवातीला त्यांच्याकडे मोसंबीची बाग होती.मात्र ही बाग तोडून त्यांनी ५ एकरावर १ हजार ५०० पेरु, ५०० लिंबू, १०० चिकू,५०० अँपल बोर आणि ५०० सीताफळ अशा एकूण ३ हजार ३०० झाडांची लागवड केली .विशेष म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या पेरु, लिंबू, अँपल बोर,सीताफळ यापासून उत्पादन सुरु झालं आहे.मात्र रासायनिक खते आणि औषधं याचा वापर त्यांनी फळबागेसाठी करणं टाळलं आहे.केवळ सेंद्रिय खत आणि जीवामृतची फवारणी केली जाते.यासाठी त्यांनी एक गाय देखील घेतली आहे.या एका गायीवरच ५ एकरावरील फळबागांची औषधे आणि खतांची गरज भागवली जाते.गेल्यावर्षी बोर,पेरू आणि सिताफळापासून धानुरे यांना एकही रुपया खर्च न करता साडेपाच लाख रुपये उत्पन्न मिळालं. यंदा खूप पाऊस झाल्याने पेरूची सेटिंग न झाल्याने त्यांना पेरुतून फारसा नफा मिळाला नाही.मात्र अँपल बोरांच्या विक्रीतून २ लाख आणि लिंबू विक्रीतून ३ लाख रुपये नफा राहील असा एकूण ५ लाखांचा नफा यंदा होईल अशी अपेक्षा धानुरे यांना आहे.विशेष म्हणजे प्रकाश धानुरे यांना माल विक्रीसाठी बाहेर घेऊन जाण्याची गरज नाही.व्यापारी स्वतः शेतात येऊन फळे खरेदी करतात.धानुरे यांनी स्वःतच्या शेतावरच फळ विक्रीसाठी स्टॉल उभारला असून दिवसभर या ठिकाणी फळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडालेली दिसून येते.या ५ एकर शेतीत लावलेल्या फळबागांपासून दर महिना ५० हजार रुपये निव्वळ नफा राहतो असं धानुरे यांनी सांगितलं आहे.
