प्रतिनिधी , शिरपूर: मकर संक्रांत हा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना या सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पतंग प्रेमी पतंग उडवून हा सण साजरा करत असतात. परंतु पतंग उडवताना नायलॉनचा मांजा वापरला जात असल्याने या मांजामुळे पशु पक्षांना व त्याच बरोबर मानवाच्या जीवाला देखील धोका पोहोचण्याची भीती असते आणि त्यामुळेच न्यायालयातर्फे देखील हा मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यानुसार शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या दोन दुकानांमध्ये बंदी असलेला नायलॉन मांज्या सर्रासपणे विक्री केला जात असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या दोनही दुकानांवर छापा टाकला . त्याठिकाणी पोलिसांना नायलॉन मांजा आढळून आला आहे .यासंदर्भात दोन्ही दुकान मालकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा सर्व मांज्या पोलिसांनी जप्त केला आहे.
