जनतेज न्युज

सिंधुदुर्ग : विजयदुर्ग किल्ल्याची बुरुजाची भिंत पडली

प्रतिनिधी , सिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे(Heavy Rain) विजयदुर्ग किल्ल्याची(Vijaydurg Fort) भिंत मंगळवारी सकाळी कोसळली. किनाऱ्याकडे तोंड असलेल्या या बुरुजाची तळाची बाजू ढासळल्याने आता वरचा बुरूज धोकादायक बनला आहे.

बुरुजाला संरक्षण देण्यासाठी ही भिंत उभारण्यात आली होती. मात्र ही भिंत कोसळली असल्याने या शिवकालीन किल्ल्याच्या तटबंदीला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. यापूर्वीच समुद्रातील एक बुरूज खालून पोखरला असल्याने या बुरुजाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू आहे. यातच हा नवीन बुरुज ढासळल्याने या किल्ल्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

ऐतिहासिक महत्त्व असलेला जलदुर्ग मराठी साम्राज्याचे सरखेल कान्होजी आंग्रे यांची विजयदुर्ग किल्ला ही दक्षिणेकडील आरमारी राजधानी होती. या किल्ल्याने तब्बल १३ लढाया झाल्या आहेत. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे आहे.