प्रतिनिधी , पुणे : पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुण्यातील (Pune) कोरोना (Corona) परिस्थितीचा आढावा घेतला. दिवसभर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करत आणि सूचना देऊन संध्याकाळी मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या शासकीय कार्यालायातून गाडी काढली तेव्हा काही पत्रकार प्रश्न विचारण्यासाठी पुढे सरसावले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गाडीच्या स्टिअरिंगवरुन हात उचलला आणि सर्व पत्रकारांना हात जोडून नमस्कार केला. हे दृश्य पाहून सर्व पत्रकार अवाक झाले. त्यांनी केलेल्या या कृतीवरून राज्याच्या कारभाराची स्टिअरिंग नेमकी कुणाकडे आहे, याबाबत आणखी संभ्रम वाढवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
कोरोनच्या संकटकाळात महाविकास आघाडी सरकारचं स्टिअरिंग नेमकं कुणाकडे आहे, हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच राज्याचे कप्तान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आहे, अशी टीका विरोधी पक्षाकडून सतत होताना दिसून येत आहे.
याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २७ जुलै रोजी ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकाच गाडीत बसले असून गाडीची स्टिअरिंग अजित पवार यांच्या हातात होती. फोटो शेअर केल्यावर दिवसभर चर्चा रंगली ती अजितदादा हा फोटो शेअर करुन नेमकं काय संकेत देत आहेत याची.
दरम्यान, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत येऊन जवळपास सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या सात महिन्यात बरेच राजकीय नाट्य घडले हे उभ्या महाराष्ट्राने बघितले. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या असो, अथवा सनदी अधिकारी, नाराजी असो किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यात सरकारमधील महत्त्वाच्या पक्षाला विचारलं जात नसल्याचा आरोप, सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने वेळोवेळी उपस्थित केला.
या सर्व घडामोडी आता विरोधी पक्षाच्या लक्षात आल्या आहेत. शिवसेनेच्या (Shivsena) हातात सरकारचं सांभाळण्याचं स्टिअरिंग असूनही काहीही उपयोग नसल्याचा आरोप सतत केला जात आहे. तर शिवसेनेकडून स्टिअरिंग आपल्याच हातात असल्याचा दावा केला जात आहे. त्यात आता मुख्यमंत्र्यांनी गाडीच्या स्टेअरिंगवरुन हात उचलून पत्रकारांना नमस्कार केला. त्यामुळे सत्तेचं स्टिअरिंग नेमकं कोणाच्या हातात आहे, याबाबतचा संभ्रम आणखीनच वाढला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी जर स्टिअरिंग सोडलं तर, सत्तेच्या महामार्गावर कोण चौथा गिअर अजित दादा टाकणार का?, कोण यूटर्न घेणार का?, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
