जनतेज न्युज

अमरावती जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

प्रतिनिधी , अमरावती : उद्या अमरावती जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात चार ठिकाणी ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्कूल कॅम्पस व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, तसेच जिल्ह्यातील तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ड्राय रन घेण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते अकरा दरम्यान ड्राय रन घेतला जाणार आहे. त्यानुसार ड्राय रनमध्ये २५ व्यक्तींच्या नोंदी व तपासणी आदी प्रक्रिया होईल. प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, लसीकरण अधिकारी, निरीक्षक आदी सहा व्यक्तींचे पथक नेमण्यात आले आहे. या सर्वांना सकाळी सव्वाआठ वाजता केंद्रावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.