जनतेज न्युज

असाही बहाद्दर शेतकरी…सरपंचपद घेतले चक्क 2.05 कोटींना!

प्रतिनिधी , नाशिक : निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विविध आमदार निधी देण्याची घोषणा करीत आहेत. मात्र उमराणे (देवळा) येथे निवडणुकीला फाटा देत चक्क सरपंचपदाचा लिलाव झाला. कांदा बाजारपेठ असलेल्या संपन्न गावात सरपंच पदाच्या लिलावाची बोली एक कोटी 11 लाखांपासून सुरु झाली. त्यात सुनील दत्तू देवरे यांनी दोन कोटी पाच लाखांची बोली देऊन सरपंचपद पटकावले.
आज सकाळी बाजार समितीच्या आवारातच हा लिलाव झाल्याचे बोलेल जाते. त्याचा एक व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. हा व्हीडीओ सगळीकडे वा-यासारखा व्हायरल झाल्याने इलेक्ट्रॅानिक्स मिडीयानेही ती हातोहात दाखवली. हा लिलाव बाजार समिती जवळ रामेश्वर महाराज मंदिरात झाला. त्यात शेतकरी व शेतीशी संबंधीत व्यापार करणारेच आघाडीवर होते. सुरवातीची बोली1.11 कोटींची होती. सुरवातीला फारसे प्रतिसाद नव्हते. मात्र शेवटच्या टप्प्यात त्यात चढाओढ सुरु झाली. कदाचीत या चढाओढीनेच ही बोली थेट दोन कोटी पाच लाखांवर पोहोचली. त्यात सुनिल दत्तू देवरे यांनी बाजी मारली. एरव्ही त्यांनी थेट सरपंचपदाची निवडणूक लढविण्याची तयारी केलीच होती. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून ते उमेदवारी करीत होते.
सामान्यतः अनेक ग्रामपंचायतींत अशा प्रकारे सरपंचपदाचा लिलाव करण्याची प्रथा रुढ होऊ लागली आहे. त्याची चर्चा नेहेमीच कानावर येते. मात्र त्याचा चक्क व्हिडीओ पहिल्यांदाच व्हायरल झाली. उमराणे गाव राजकीयदृष्ट्या विशेष जागरुक आहे. येथे सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते आहेत. कांदा प्रश्नावरुन येथे नेहेमीच आंदोलनाच्या ठिणग्या पडत असल्याने या गावाची चर्चा होते. आज मात्र सरपंचपद थेट दोन कोटी 5 लाखांना गेल्याने या गावाची चर्चा होत आहे. थेट लिलावाचे संवाद चित्रण रेकॅार्ड झाल्याने प्रसारीत झालेल्या बातम्यांवरुन नवा वाद निर्माण झाला तर मात्र लिलावात घेतलेल्या सरपंचपदाचा आनंद किती काळ टिकेल हा प्रश्नच आहे.