जनतेज न्युज

चोपड्याच्या तापी सह.सूतगिरणीला दहा कोटींची केंद्र शासनाची सबसिडी,चेअरमन माजी आमदार कैलास पाटील यांची माहिती

प्रतिनिधी , चोपडा : येथील तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीला सुमारे दहा कोटी रुपयांची एक रकमी सबसिडी मिळाल्यामुळे प्रकल्प आर्थिक चणचण संपून स्वयंपुर्णतेकडे वाटचाल करणार आहे. तालुक्याच्या सभासद व शेतकऱ्यांना सुतगिरणीचा प्रत्यक्ष लाभ व्हावा म्हणून स्वतःची जिनिंग प्रेसिंग कार्यस्थळावर सुरु करणार असल्याची घोषणा करीत पंधरा दिवसात भुमिपूजन करणार असल्याचे चेअरमन माजी आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी पुढे बोलतांना माजी आमदार कैलास पाटील म्हणाले की, सूतगिरणी प्रकल्प तालुक्याला वैभवशाली बनविण्याकडे वाटचाल करीत असतांना सद्यस्थितीत १०० कोटींचा प्रकल्प उभा झाला आहे.सुतगिरणी उभी करतांना राज्य शासनाची मोठी मदत झाली २७ कोटी रुपये भागभांडवल शासनाने उपलब्ध करुन दिले. शेतकऱ्यांनी तीन करोड रुपये भाग भांडवल उपलब्ध झाले.त्यामुळे चोपडा तालुक्यात सूतगिरणीचा युवकांना रोजगार देणारा प्रकल्प उभा राहू शकला.त्यासाठी एन.सी.डी.सी. ने ४४ कोटींचे कर्ज मंजूर करुन खूप मोठा हातभार लावला.आपल्या प्रकल्पाची सुरूवात २३ मार्च २०१७ झाली अन पहिल्या आर्थिक वर्षांपासून केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने आपल्याला सबसिडीची रक्कम देवू केली.त्यामध्ये २०१६-१७ ला ९० लाख ५८ हजार ४०० रुपये तर २०१८-१९ ला ३२ लाख १९ हजार ४०० रुपये सबसिडी प्राप्त झाली.तसेच २०१९-२० मध्ये ६४ लाख ८६ हजार ७०० रुपये व ८५ लाख रुपये सबसिडी प्राप्त झाली.तथापि केंद्राकडे राहिलेली सबसिडी सात वर्षे टप्प्याने मिळणार असल्याची करारात अट होती.परंतु अश्या कालावधीने सबसिडी मिळाली तर प्रकल्पाचे व्याजात मोठा भाग जाईल.त्यामुळे सूतगिरणी स्वयंपूर्ण होण्यात अडचण येईल याचा विचार करुन व्हाईस चेअरमन पी.बी.पाटील व संचालक मंडळ सदस्यांनी एकजुटीने प्रयत्न करुन सबसिडीची रकम लवकरात लवकर एक रकमी मिळावी म्हणून दिल्लीत जावून कसोशीने प्रयास केले.त्याला यश आले असून सूतगिरणीला एन.सी.डी.सी.ने ९ कोटी ९० लाख ३० हजार पाचशे रुपये सबसिडी खात्यावर प्राप्त झाल्याचे पत्राने कळविले आहे.त्यामुळे सूतगिरणीची आर्थिक चणचण संपणार असून प्रकल्प आत्मनिर्भर होण्यास मदत होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.