प्रतिनिधी , मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपापल्या घरातील लाईट बंद करून नऊ मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोनाविरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र यामुळे नऊ मिनिटे एकाच वेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका उद्भवू शकतो. संभाव्य धोका लक्षात घेता आपल्या राज्यात, महानिर्मिती, महापारेषण, महावितरण व महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र या सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच जनतेनेही आवश्यक तितकेच लाईट चालू ठेवून दिवे, मेणबत्ती इत्यादी लावावेत, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जनतेला केले आहे.
जर देशात एकाच वेळी लाईट बंद केल्यास विजेची मागणी कमी होऊ शकते. लॉकडाऊनमुळे आधीच विजेची मागणी घटल्यामुळे वीज उत्पादन आणि पुरवठ्याचे गणित बदलले आहे. जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केल्यास अजून परिस्थिती बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास किंवा कमी झाल्यास फ्रिक्वेन्सीमध्ये अनावश्यक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जनतेने काळजीपूर्वक विचार करावा व आवश्यक तितके लाईट चालू ठेवून, दिवे किंवा मेणबत्ती लावावी, असे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.
सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्याची पॉवर डिमांड ही २३ हजार मेगावॅटवरून १३ हजार मेगावॅटवर आली आहे. लॉकडाऊनमुळे इंडस्ट्री लोड पूर्णतः झिरो झाले आहे. १३ हजार मेगावॅट विजेवर केवळ अत्यावश्यक सेवा आणि घरगुती विजेचे लोड आहे. सर्वांनी अचानक दिवे बंद केल्यास सर्व पॉवर स्टेशन हायफ्रिक्वेन्सीवर जाऊ शकतात. परिणामी आपल्या ग्रीडमध्ये अनावश्यक फीडर ट्रीपिंग्स येऊ शकतात. मोठ्या प्रमाणात पॉवर डिमांड असलेल्या महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात वीज फेल्युरमुळे परिणामी सर्व पॉवर स्टेशन बंद पडल्यास “मल्टी स्टेट ग्रीड फेल्युर” होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवा, हॉस्पिटल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, एक पॉवर स्टेशन सर्व्हिसमध्ये यायला साधारणतः १२ ते १६ तास लागू शकतात. कोरोनाविरुद्ध युद्धासाठी या देशातील वीज ही सर्वांत महत्त्वाची घटक आहे. त्यामुळे विजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.
