प्रतिनिधी , नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ येथे राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याला एक पिझ्झा तब्बल 50 हजारांना पडलाय. घडले असे की नेरूळ सेक्टर ६ येधील मेरिडीयन सोसायटीत विष्णू व रोमी श्रीवास्तव हे दोघेच राहतात. विष्णू यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्याने जेवण काहीतरी बाहेरून मागावण्याच्या दृष्टीने त्यांनी ऑनलाइन पिझ्झा मागवला. पिझ्झा ची ऑर्डर देताच त्यांना एक फोन आला. फोनवर 5 रुपये भरण्याचे सांगत त्यांना एक लिंक पाठवण्यात आले त्या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक खात्यातून सलग पाच वेळा १० हजारांचे व्यवहार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पुढचे संपर्क टाळले. आयुष्याची जमापुजी पीएमसी बँक घोटाळ्यात अडकल्यानंतर दुसऱ्या बँक खात्यात त्यानी निवृत्तिवेतनाचे एक लाख रुपये साठवले होते, त्यातल्या ५० हजारांवर अज्ञाताने डल्ला मारल्याने त्यांच्यासमोर भविष्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. या वृद्ध दाम्पत्याने संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी नेरुळ पोलिस स्थानकात धाव घेतली असता पोलिसांनी गुन्हा दाखल न करता उडवाउडवीची उत्तर देत या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वृद्ध दाम्पत्याने केलाय.
