जनतेज न्युज

केळवद एक ट्रॅक्टर चं गाव ; पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात तब्बल दोनशे ट्रॅक्टर

प्रतिनिधी, बुलडाणा : मंडळी, शेती करण्यासाठी बैलाची जागा आता ट्रॅक्टर ने घेतली, त्यामुळे अनेक गावात ट्रॅक्टरांची संख्या वाढलीये. मात्र बुलडान्यात एक गाव आहे ज्याची ओळख ट्रॅक्टरचे गाव म्हणून आहे. आता तुम्ही म्हणाल या गावात ट्रॅक्टर किती असतील पाच, दहा , पंधरा , वीस. तर नाही या पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात तब्बल दोनशे ट्रॅक्टर आहेत. आणि या ट्रॅक्टर मुळे गावात वर्षाकाठी चार ते साडेचार कोटी रुपयांची उलाढाल होते.

बुलडाणा तालुक्यात केळवद गावात 1972 साली बाबूराव पाटील यांनी पाहिलं ट्रॅक्टर आणलं. आणि तिथून गावात ट्रॅक्टर ची आज दोनशे झालीये… भानुदास पाटील यांच्या मुलाकडे आता चार ट्रॅक्टर आहेत.शेती मशागती साठी लागणारं असं एकही अवजार नाही जे या गावात मिळत नाही, सर्व अवजारे या गावात आहेत. ट्रॅक्टर संख्येच्या तुलनेत गावात शेतीच क्षेत्रफळ तसं कमी आहे, पण गावातील कामे झाली की हे शेतकरी परिसरातील गावांमध्ये कामासाठी जातात.  एवढंच नाही तर गावात दहा वर्षांपूर्वी दुसऱ्याच्या ट्रॅक्टर वर ड्रायव्हर असलेल्या किशोर पांढरे यांनी ट्रॅक्टर ला मिळत असलेली कामे आणि उत्पन्न पाहता आज त्याच्याकडे स्वतःची तीन नवीन ट्रॅक्टर आहेत. शिवाय गावातील ट्रॅक्टर वर शेकडो मजुरांना नियमित आणि वर्षभर रोजगार मिळतोय, काम शोधण्याची गरज पडत नाही.

       तुकाराम वाघमारे यांचं शिक्षण एम ए पर्यंत झालं, त्यांच्याकडे पाच – सहा एकर शेती होती पण निसर्गाच्या लहरीपणामुळे ती परवडत नव्हती, त्यामुळे त्यांनी चौदा वर्षांपूर्वी एक ट्रॅक्टर घेतला त्याच्या भरवश्यावर आज ते दिवसाकाठी चार ते पाच हजार रुपये उत्पन्न घेतायेत.  खरंतर शेती ही निसर्गावर आणि पिकांचे भाव हे सरकारच्या धोरणावर अवलंबून आहेत.त्यामुळे शेती अनेकदा तोट्यात जाते. मात्र याच निसर्गाच्या लहरीपणाची आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात ओरड केल्यापेक्षा, शेती सोबत जर जोडधंदा केला तर निश्चितच त्यापासून आर्थिक प्रगती साधता येते. हेच या गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे.