जनतेज न्युज

कोकण विभागात मनरेगा अंतर्गत २४ हजार ६०३ मजुरांची उपस्थिती

विविध रोजगार योजनेअंतर्गत कामांच्या संख्येत वाढ

नवी मुंबई, दि. २४:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागात मनरेगा योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 5 हजार 025 कामांना सुरुवात झाली असून उपस्थित मजूरांची 24 हजार 603 झाली आहे. पालघर जिल्ह्यातील कामांना मजुरांचा चांगला प्रतिसाद आहे अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.

कोकण विभागातील जिल्हयांतर्गत कृषि, वनपरिक्षेत्र, वनप्रकल्प विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम विकास अशा विविध विभागांमार्फत सुरु करण्यात आलेल्या कामांची संख्या व कामावर उपस्थित मजूरांची संख्या अशी ठाणे-322 कामे 1 हजार 069 मजूर, रायगड-198 कामे 653 मजूर, पालघर 2 हजार 141 कामे 16 हजार 055 मजूर, रत्नागिरी 1 हजार 511 कामे 4 हजार 481 मजूर, सिंधुदूर्ग 853 कामे 2 हजार 345 मजूर संख्या आहे. यात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक कामे सुरु असून इतर जिल्ह्यांपेक्षा मजुरांची उपस्थिती लक्षणीय आहे. इतर जिल्ह्यांनीदेखील कामांची संख्या व मजूरांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन श्री. दौंड यांनी यावेळी केले.

सोशल डिस्टंन्सिंगचे नियम तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अटीशर्तींच्या अधीन राहून कोकण विभागाअंतर्गत जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत, कृषि, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांमार्फत विविध ठिकाणी बांधकामाच्या कामांना २२ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये रस्तेदुरुस्ती, नवीन रस्त्यांचे बांधकाम, नाले सफाई, नवीन नाल्यांचे बांधकाम, छोट्या नद्यांवरील मोऱ्यांची दुरुस्ती व बांधकाम अशा कामांचा समावेश आहे. पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन या कामांची संख्या वाढविण्यात आली आहेत. मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम) या योजनेअंतर्गत विविध विभागांमार्फत उपलब्ध करुन दिलेल्या वाढत्या कामांमुळे लॉकडाऊनच्या काळात बिघडलेले मजुरांचे आर्थिक गणित सुरळीत होण्यास मोठी मदत होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.