जनतेज न्युज

कोरोना काळात हनीमून पडले महागात.

धुळ्यातील नवविवाहित दाम्पत्य अडकले मालदीवमध्ये
मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करून नवऱ्यामुलाने केली मदतीची मागणी
माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे यांच्याकडून नवविवाहित दांपत्यास भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू…

प्रतिनिधी , धुळे : कोरोनाच्या संकट काळामध्ये नवविवाहित दांपत्यास मालदीव येथे फिरण्यासाठी जाणं चांगलाच महागात पडल आहे.
विवाहानंतर फिरण्यासाठी मालदिवमध्ये गेलेल्या शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील नवदाम्पत्यातील पत्नीचा तेथे केलेल्या चाचणीतून करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे दोघांनाही स्वतंत्र दोन खोल्यांमध्ये क्वारंटाइन करण्यात आले. दरम्यान भारतातील ट्रॅव्हल्स कंपनी व तेथील हॉटेल व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे त्यांना एकमेकांना भेटूही दिले जात नसल्याने नवदाम्पत्य खचले आहे. यातील तरुणाने ट्रिटरद्वारे केंद्र आणि राज्य सरकारकडे भारतात परतण्यासाठी मदतीची याचना केली असून, त्याची दखल घेत राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार डॉ . सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, यांनी पाठपुरावा सुरू केला आहे .
शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील वीरपाल गिरासे व दुर्गेश्वरी यांचा विवाह गेल्या २८ फेब्रुवारीला झाला . विवाहानंतर सात मार्चला वीरपाल नववधू दुर्गेश्वरीसह मालदीवला महाराष्ट्रातील एका खासगी टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे पर्यटनासाठी गेला. १३ मार्चला ते भारतात परतणार होते. भारतातून मालदीवला जाताना त्यांनी करोना चाचणी देखील केली होती. यात दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आला होता. यानंतर दोघेही मालदीवला पोहोचले. तेथे एक दिवस फिरल्यानंतर काहीही कारण नसताना तथा त्यांच्यात कोणतीही लक्षणे नसताना दोघांची तेथे पुन्हा करोना चाचणी घेणार असल्याचे सांगण्यात आले. यावर वीरपालने भारतातून निघताना आम्ही कोरोना चाचणी केली असून दोघांचा तपासणी अहवालही दाखविला. तरीही त्यांना सक्तीने कोरोना चाचणी करावी लागली. या चाचणीत वीरपालची पत्नी दुर्गेश्वरीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांना सांगण्यात आले.
यानंतर दोघांना वेगवेगळ्या रूममध्ये ठेवण्यात आले. त्यात दुर्गेश्वरी पॉझिटिव्ह आल्याने तिला खासगी टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीने कोणतीही सुविधा देण्याचे नाकारले आणि फोन घेणेही बंद केले आहे. यात खासगी ट्रॅव्हल्स कंपनी व संबंधित हॉटेल व्यवस्थापनाच्या वादात गिरासे दाम्पत्याला नाहक मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मालदीव मध्ये अडकलेल्या नवविवाहित दाम्पत्यास खाण्यापिण्यासह कुठलीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जात नाहीये. तसेच रुग्णालयात दाखलही होऊ दिले जात नाहीये. एवढेच नव्हे , तर वीरपाल आणि दुर्गेश्वरीला एकमेकांना भेटूही दिले जात नसल्याने दोघांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे .एक प्रकारे आम्हाला येथे अपहरण करून आणल्यासारखे वाटत असल्याची व्यथाही वीरपालने व्यक्त करत येथून आमची लवकर सुटका करावी, अशी विनंती भारत सरकार , महाराष्ट्र सरकारकडे ट्विटरद्वारे केली आहे.