प्रतिनिधी , जळगाव : पारोळा तालुक्यातील टोळी या छोट्याशा गावाजवळ एका 20 वर्षीय दलित तरुणीवर अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकिस आलेली आहे. या पिडीत तरुणीचे अपहरण करून तिला जबरदस्ती गुंगीचे औषध पाजण्यात आलेले होते. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला जबर मारहाण करण्यात आली व जखमी अवस्थेत बस स्थानकाच्या मागील बाजूस फेकून देण्यात आले होते. तिच्यावर विष प्रयोग देखील करण्यात आला असल्याची माहिती समोर आलेली आहे. या संदर्भात तरुणीच्या मामाने पारोळा पोलीस ठाण्यात आज रोजी फिर्याद दिलेली आहे.
सविस्तर वृत्त असे की पारोळा येथील साने गुरुजी कॉलनी परिसरात राहणारे तरुणीचे मामा यांची 3 नोव्हेंबर रोजी भाची घरात दिसली नाही म्हणून
शोध घेतला असता ती सापडली नाही म्हणून 8 नोव्हेंबरला भाची बेपत्ता झाल्याची नोंद पारोळा पोलीस ठाण्याला नोंदवली. त्याच दिवशी समजले की पारोळा कुटीर रुग्णालयात एका तरुणीस विषबाधा झाल्यामुळे दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे ते खात्री करण्यासाठी कुटीर रुग्णालयात गेले असता तिथे उपचार घेत असलेल्या भाचीस ओळखले. त्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. रूग्णवाहिकेतून नेत असताना भाचीला शुद्ध आली असता, त्यावेळी तिने फिर्यादी मामा, तिची आई आणि मोठी बहिण यांना घडलेला गंभीर प्रकार सांगितला. या तरुणीस शिवानंद शालिक पवार रा. टोळी ता.पारोळा हा सदरील तरूणीला मैत्री करण्यासाठी फोन करण्याचा सारखा इशारा करीत असे. पण तिने दुर्लक्ष केल्याने शिवनंदन शालीक पवार, पप्पू अशोक पाटील, अशोक वालजी पाटील यांनी तिच्यावर अतिप्रसंग करून सामूहिक बलात्कार केला आहे. तसेच पारोळा येथून अपहरण करून गुंगीचे औषध देत कासोदा गावाच्या जवळ अज्ञात ठिकाणी नेऊन सामूहिक अत्याचार केला. या पिडित तरूणीवर धुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झालेला आहे. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात सदरील तिन्ही आरोपींच्या विरोधात ॲट्राॕसिटी कलम(2) VA तसेच 302, 363, 328, 376(2), 323, 504, 506,34 या प्रमाणे सामुहिक अत्याचार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्ह्याचा पुढील तपास डिवायएसपी राकेश जाधव हे करीत आहे.
