जनतेज न्युज

जिल्ह्यातल्या ऊसदराची कोंडी अखेर फुटली,एकरकमी एफआरपी देण्याचं कारखानदारांचा निर्णय..

प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्ह्यातल्या ऊसदराची कोंडी अखेर फुटली आहे,यंदाच्या हंगामात एकरकमी एफआरपी देण्याचे साखर कारखानदारांनी मान्य केला आहे. सांगलीच्या कडेगाव मध्ये पार पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जिल्ह्यातल्या कारखानदारांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील ऊस गाळप सुरू झालेला आहे आणि सांगली जिल्ह्यातल्या कारखानदारांकडून एफआरपी जाहीर करण्यात आली नव्हती,शिवाय टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याबाबत साखर कारखानदारांनी भूमिका घेतली होती.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला होता मात्र सांगली जिल्ह्यातल्या कारखानदार आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलं होतं आणि याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्या मध्ये काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली होती,मात्र या बैठकीमध्ये कोणताही निर्णय न झाल्याने ही बैठक निष्फळ ठरली होती त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी पार्टी मुद्द्यावर ठाम राहत आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा दिला होता.त्या पार्श्वभूमीवर बुधवारी कडेगाव येथील सोनहिरा साखर कारखान्याच्या कार्यालयामध्ये जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना मध्ये पुन्हा बैठक पार पडली आणि या पार पडलेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातल्या सर्व कारखानदारांनी एक रकमी एफआरपी देण्याचं मान्य केलेले आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली ऊस दराची कोंडी अखेर फुटली आहे.त्यामुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम आता सुरळीत पार पडणार आहे.