प्रतिनिधी , उस्मानाबाद : जीएसटीमधील जाचक अटीच्या निषेधार्थ अखील भारतीय व्यापारी महासंघाने एक दिवशीय भारत बंद पुकारला असुन या बंदला उस्मानाबाद जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या भारत बंदमध्ये कर सल्लागार व वहातुक संघटनांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
जीएसटीमधील जाचक अटींमुळे व्यापारी, कर सल्लागार यांचे अतोनात हाल होत असुन या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात आपापली दुकाने बंद ठेऊन सहभाग नोंदवला. यावेळी फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आली होती. उस्मानाबाद जिल्हा व्यापारी असोशिएशनच्या वतीने शहरात मोटार सायकल रॅली काढून दुकानदारांना बंदचे अवाहन करण्यात आले. जीएसटी मधील जाचक अटी रद्द करण्यात याव्या यासाठी व्यापारी महासंघाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. व्यापाऱ्यांच्या या बंद मध्ये कर सल्लागार तसेच वाहतूक संघटनांनीही सक्रिय सहभागी झाल्या होत्या.
