प्रतिनिधी, यवतमाळ: आठ लाख जप्त; अवघ्या काही तासांत लागला छडा
यवतमाळ ते धामणगाव मार्गावरील करळगाव घाटात सायंकाळी सातच्यादरम्यान रोडरॉबरी करून आठ लाख रुपये लुटून नेल्याची घटना बनावट निघाली. टेंपोचालकानेच रोडरॉबरीचा बनाव केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
फैसल खान महेमूद खान (वय 22, रा. वरूड, जि. अमरावती) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तो पवन गांधी यांचा वाहनावर दोन वर्षापासून चालक आहे. मंगळवारी (ता. तीन) दुपारी दहा टन मका घेऊन तो टेम्पो घेऊन आर्णीकडे निघाला होता. सोबत आठ लाखांची रोकडही होती. दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी वाहनावर दगडफेक केली व रोकड लुटून नेल्याचे गांधी यांना फोनद्वारे सांगितले. यवतमाळ ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. चालक सांगत असलेली हकीकत व वाहतूक भौगोलिक स्थितीवरून पोलिसांना संशय आला. ठाणेदार गजानन करेवाड, सपोनि विनोद चव्हाण यांनी टेम्पोचालकाकडे सखोल चौकशी केली असता, रोडरॉबरीचा बनाव उघड झाला.
करळगाव घाटात लपवून ठेवलेली रोकडही जप्त करण्यात आली. पवन गांधी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक फैसल खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
