प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरात भंगार गोडाऊनला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल आटोकाट प्रयत्न करत आहेत. कल्याण डोंबिवलीतील अग्निशमन दलाची सर्व गाडया आणि पाण्याचे टँकर आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून ठाणे आणि नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले आहे.
आज दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या ही आग लागली असून शेजारी असणाऱ्या भंगार वस्तूंमुळे ती काही क्षणातच पसरली. या आगीची तीव्रता पाहता गोडाऊनशेजारील इमारती आणि घरे रिकामे करण्यात आले असून इथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली. तसेच आग पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे तिच्यावर नियंत्रण मिळवण्यात काहीशी अडचण येत असून नागरिकांनी विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
