जनतेज न्युज

अत्याचारप्रकरणी आरोपीला दहा वर्षे शिक्षा

प्रतिनिधी , यवतमाळ : शिकवणीवर्गातून ऑटो पॉइंटवर आलेल्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल अतिरिक्त सहायक जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी दिला.
गुणवंता गेडाम (रा. डोंगरखर्डा, ता. कळंब) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दोन जून 2017 रोजी अल्पवयीन मुलगी शिकवणी वर्ग आटोपून ऑटो पॉइंटवर आली. त्यावेळी आरोपीने मुलीचा हात पकडून बसस्थानकाकडे बोलावले. जबरदस्तीने दुचाकीवर बसायला सांगितले. आरोपीचा मामेभाऊ नीलेश मुलीच्या सांगण्याप्रमाणे सोबत गेला. रावेरी गावाजवळ पोहोचताच गुणवंताने जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला. मोबाइलमध्ये अश्‍लील फोटो काढून ही बाब कुणाला सांगितल्यास फोटो लोकांना दाखविण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने राळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. कलम 4 बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा 2012प्रमाणे दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा ठोठाण्यात आली.
सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी बाजू मांडली.