प्रतिनिधी , नागपूर : नागपुरात काेरोना बाधितांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. अलिकडच्या काही दिवसात सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. २८ जून रोजी ६५, २९ जून रोजी ६२, ३० जून रोजी ७४, १ जुलै रोजी ८०, २ जुलै रोजी ९५ कोरोना बाधितांची नोंद झाल्यानंतर रविवार ३ जुलै राेजी १०५ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली.कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. हे लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरीत कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्या नंतरही नागरिक बेफिकीर वागत असल्याचे दिसून येते. परिणामी कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. २३ जून रोजी नागपुरात ९५ तर २४ जून रोजी ६५ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती.एकूण सक्रिय रूग्ण ५१५ असून यात शहरातील ३६०, ग्रामीणमधील १५५ बाधितांचा समावेश आहे.
नागपुरात कोरोना रूग्णांच्या संख्येत चढउतार होत असले तरी बरे होणाऱ्या रूग्णांची संख्याही जास्त आहे. गेल्या सहा महिन्यात प्रथमच २ जुलै रोजी एका कोरोना बाधीताच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. हा रूग्ण ग्रामीणमधील होता. काल कोणत्याही मृत्यूची नोंद नाही. कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहाता नागरिकांनी किमान गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
