जनतेज न्युज

पल्स पोलिओ लसीकरणाला अमरावतीत सुरुवात

अप्रतिनिधी , मरावती : आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे पाच वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस दिला जाणार आहे. याची सुरुवात आज सकाळी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयातुन करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात १ लाख ७२ हजार ४३० बालकांचे पोलिओ लसीकरण होणार आहे. या मोहिमेत बुथ ॲक्टिविटीद्वारे ग्रामीण भागात १ लाख ३५ हजार ३५२ व नागरी भागात ३७ हजार ७८ अशा १ लाख ७२ हजार ४३० बालकांचे लसीकरण होणार आहे. ग्रामीण भागात १ हजार ७६३ व नागरी भागात २०० असे १९६३ बुथ असतील. त्यासाठी जिल्ह्यात ४ हजार ८३० स्वयंसेवकांचे मनुष्यबळ कार्यरत करण्यात आले आहे.
सर्व बालकांचे १०० % लसीकरण झाले पाहिजे. महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे, धाबे, शेतातील लाभार्थी, पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके या सर्वांचे लसीकरण व्हावे, त्यासाठी मोबाईल पथकांनी सर्वदूर पोहोचून मोहिम यशस्वी करावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.