जनतेज न्युज

पाली बसस्थानकाला दूषित सांडपाणी व दुर्गंधीचा विळखा, नागरिकांचे  आरोग्यही  धोक्यात 

प्रतिनिधी , सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेले पाली बसस्थानकासमोरील पटांगणात येणारे गटारातील सांडपाणी व घाणीने मोठ्या प्रमाणात जीवजंतूंची पैदास वाढत आहे, तसेच दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाचे स्वछता व प्रवाशांना सोयीसुविधा देण्याच्या गंभीर बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने जन मानसातून संताप व्यक्त होतोय. शाळकरी मुले, वृद्ध प्रवाशी , रुग्ण यांना घाणीचे सांडपाण्यातून ये जा करावी लागते, त्यामुळे या आरोग्य व रोगराईची भीती निर्माण झालीय. बसस्थानकासमोर दोन भल्या मोठ्या व उघड्या नाल्यातून मोठ्याप्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. येथील अक्षम्य अस्वछता व असह्य दुर्गंधी यामुळे बसस्थानक व आजूबाजूच्या बाजारपेठेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे आरोग्य  धोक्यात आले आहे. कोरोना सारख्या जागतिक आजाराने राज्य व देशातील जनतेला बेजार केले, आजही म्हणावे तसे कोरोना चे संकट टळले नाही, सर्वत्र स्वच्छता व जनजागृतीवर भर दिला जातोय, पाली सुधागडात कोरोनाचे रुग्ण आजही सापडत आहेत. अशातच पाली बसस्थानकाचे प्रवेशद्वार असलेल्या मार्गावर मागील अनेक वर्षांपासून दोन मोठे नाले आहेत. या नाल्यात गटाराचे घाणीचे पाणी तुंबत असून अनेक कीटक जीवजंतू ची पैदास होत आहे.  शिवाय हे नाले उघडे असल्याने यातून सतत दुर्गंधी येत असते. या नाल्यात अनेकदा वाहने फसून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या  नाल्याच्या बाजूने बसस्थानकात एसटी बस शिरतात व येथूनच बाहेर देखील येतात, त्यामुळे मोठ्या अपघाताची देखील शक्यता आहे. नागरिकांची सातत्याने  मागणी होऊन देखील अद्यापपर्यंत या नाल्यांच्या बाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली दिसत नाही. पाली बसस्थानक असल्याने  या ठिकाणी सतत नागरिकांची वर्दळ व रहदारी सुरू असते, शिवाय  सभोवताली दुकाने, हॉटेल, रसवंती गृह तसेच मच्छी व मटण मार्केट असल्याने नागरिकांची रेलचेल असते. त्यामुळे या नाल्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ या नाल्याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी जन माणसातून जोर धरत आहे.