प्रतिनिधी , पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील सहकारी कारखानदारी ही संकटात आहे. महाविकास आघाडी सरकार हे साखर कारखान्याबाबत राजकारण करत आहे. त्यातच पांडुरंग सहकारी कारखाना व मंगळवेढा येथील युटोपियन शुगर कारखान्यातील ऊस गाळप क्षमतेपेक्षा जास्त गाळप करण्यावर भर देणार आहे. यातून पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे माहिती पांडुरंग सहकारी कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सहकार चळवळीचे नेतृत्व आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे जाणार असे दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश सहकारी साखर कारखाने हे थकीत बिलामुळे अडचणीत आले आहेत. पांडुरंग व युरोपियन साखर कारखाने हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची संपूर्ण रक्कम देण्याची हमी दिली आहे. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल, चंद्रभागा, भीमा व सीता राम हे उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत बिले, ट्रॅक्टरचालक मालकांची बिले व कामगारांचे पगार थकित आहेत. पुढील हंगामात हे कारखाने सुरू होतील का नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यातच आज विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ कारखाना सुरू करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेणार आहे. यामुळे पंढरपूर तालुका हा ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो. याठीकाणी उसाचे उत्पन्न अधिक प्रमाणात आहे. मात्र पंढरपूर तालुक्यातील कारखानदारी राजकारणामुळे आजारी पडली आहे. या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी श्रीपूर येथील पांडुरंग व मंगळवेढा येथील युटोपियन शुगर कारखाना क्षमतेपेक्षा जास्त गाळप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आमदार प्रशांत परिचारक हे धावून आले आहे.
