प्रतिनिधी , पुणे : घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदेशीर बेटिंग घेणाऱ्या 31 जणांना पुणे पोलिसांनी एका विशेष कारवाईदरम्यान अटक केलीय. शहरातील हडपसर, कोंढवा, वानवडी परिसरात पोलिसांनी एकाच वेळी केलेल्या कारवाई दरम्यान बेकायदेशीर बेटिंग करणारे मोठे बुकी पोलिसांच्या जाळ्यात सापडले. पोलिसांनी याप्रकरणी सहा गुन्हे दाखल केले असून लॅपटॉप, मोबाईल, रोख रक्कम असा तीन लाखाहुन अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेसकोर्स परिसरात होणाऱ्या घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी वेगवेगळी पथके स्थापन करून एकाच वेळी शुक्रवारी रात्री वानवडी, कोंढवा, हडपसर परिसरातील बुकींच्या घरावर छापे मारण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी वानवडी, कोंढवा, हडपसर या पोलीस स्टेशनमध्ये 6 गुन्हे दाखल केले असून 31 जणांना अटक केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 31 मोबाईल, सहा लॅपटॉप, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण तीन लाख 41 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
