जनतेज न्युज

बीएसएनएलची फोर जी सेवा त्वरित सुरु करा या प्रमुख मागणीसाठी बीएसएनएल कर्मचारी अधिकाऱ्यांचे आंदोलन

प्रतिनिधी , औरंगाबाद : बीएसएनएलचे टॉवर्स आणि फायबरच्या  खाजगीकरणाचे धोरण रद्द करून बीएसएनएलची फोर जी सेवा त्वरित सुरु करा या प्रमुख मागणीसाठी सर्व कर्मचारी अधिकारी संघटनानी एकत्र येऊन आज 28 जुलै रोजी देशपातळीवर निषेध दिन पाळून निदर्शने केली. औरंगाबाद येथील संचार सदन या ठिकाणी बीएसएनएल कर्मचारी अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन आंदोलन यशस्वी केले.  ” राष्ट्रीय मुद्राकरण पाईपलाईन ” धोरणास अनुसरून केंद्र सरकारने बीएसएनएलचे 14917 टॉवर्स आणि फायबर हे महत्वाचे ऍसेट खाजगी कंपनीकडे हस्तांतरित करण्याचे षडयंत्र आखले आहे.  संचार सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेले आणि बीएसएनएलने कोणत्याही सरकारी मदतीशिवाय स्वतःच्या उत्पन्नातून उभे केलेले अत्यंत महत्वाचे नेटवर्क खाजगी मालकाला दिल्यास बीएसएनएलला स्वतः उभे केलेले हे नेटवर्क वापरण्यासाठी  त्या कंपनीला भाडे द्यावे लागेल अशी परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे आधीच फोर जी सेवा सुरु न केल्याने आर्थिक नुकसानीत चालणारे बीएसएनएल कोलमडून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकप्रकारे बीएसएनएल कंपनी बंद करण्याचाच हा प्रयत्न असून देशातील सर्वसामान्य ग्राहक, ग्रामीण आदिवासी दुर्गम भागातील जनता यांच्या हितासाठी सरकारने हा निर्णय रद्द करावा यासाठी बीएसएनएल मधील सर्व कर्मचारी अधिकारी संघटना एकवटल्या असून आज  सर्व देशभर काळा दिवस पाळून आणि जिल्हा मुख्यालयावर निदर्शने  करून आपला विरोध प्रदर्शित  करण्यात आला. याप्रसंगी संचार सदन येथे झालेल्या द्वारसभेस कॉम. रंजन दाणी आणि कॉम. जॉन वर्गीस यांनी संबोधित केले. कॉम शिवाजी चव्हाण यांनी संचालन केले. कॉम वाय ए जंगले यांनी आभार मानले. विविध संघटनांचे प्रमुख नेते कॉम बी आर गणकवार, कॉम हरीश साबळे आदींची उपस्थिती होती.