प्रतिनिधी , कोरोना काळात राज्य डबघाईस आले असताना ऊर्जामंत्री बंगल्यावर वारेमाप खर्च करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, हाय लिव्हींग, हाय थिंकिंग… आणि मी बाबासाहेबांचा पाईक आहे. असे असले तरी अवास्तव खर्च करणार नाही, असे उत्तर डॉ. राऊत यांना भाजपच्या ट्विटला दिले आहे.
मी मंत्री झालो तेव्हा सव्वा वर्ष भाड्याच्या घरात राहत होतो. अजूनही बंगल्याचे काम अपूर्ण आहे. जुने सोफे इकडून तिकडून आणून टाकले आहेत बस्स. बंगल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आपण बोलू शकाल की लॅविष बंगला केला. असे असले तरी मी अवास्तव खर्च करणार नाही. आपण केलेला खर्च योग्य पद्धतीने आहे की नाही, हे पाहत असतो. राज्याचा विरोधी पक्ष म्हणजे केवळ विरोधासाठी विरोध येवढाच आहे. पूर्ण माहिती घेऊन टिका केली पाहिजे. चांगले राहणे आणि चांगले विचार ठेवणे, हे काही वाईट नसते. खर्च विनाकारण झालेला असेल, तरच कुणाला बोलण्याची जागा आहे, अन्यथा नाही.
कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना १४ हजार कोटी रुपयांची थकबाकी होती. आता ५९ हजार कोटींची थकबाकी आहे. भाजपने कधी वसुली केलीच नाही. शेतकऱ्यांना कमी दराने वीज दिली जाऊ शकते. पण वीज कंपनी खासगी असती तर कमी दराने वीज देणे शक्य होते का? तरीही भाजपला कंपन्यांचं खासगीकरण करायचं असल्याचा टोला डॉ. राऊत यांनी हाणला.
ॲंजिओप्लास्टी झाल्यानंतर मला ६ सतें लागले. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झालं. त्या परिस्थितीतही ३ वेळा मी रस्ता मार्गे येण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांनी मला प्रवास न करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी मी व्हीसी द्वारे बैठकांना उपस्थित राहात होतो. पण काही निर्णय असे असतात की जे व्हीसीवर होऊ शकत नाही. म्हणून मग कंपन्यांनी माझ्या येण्याजाण्याची सोय केली, असे उत्तर डॉ. राऊत यांनी विरोधकांच्या आरोपावर दिले. शेतकऱ्यांसाठी योजना आणली त्यावेळी ४५ हजार कोटी बाकी होते. १५ हजार कोटी माफ केले आणि ३० हजार कोटी देण्यास सांगितले. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना वीज देण्यासाठी चांगलं काम होईल, अशी योजना आणली.
