प्रतिनिधी , अहमदनगर : अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथे 8 गावठी कट्टे आणि 10 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. श्रीरामपूर येथे विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टे बाळगणाऱ्या तीन सराईत आरोपींना जेरबंद केलंय. राहुल कलानी, आकाश जुनी आणि अक्षय कलानी अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 2 लाख 45 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला एनसीबीमार्फत श्रीरामपूर येथे काही जण गावठी कट्टे विक्रीच्या उद्देशाने घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये गावठी कट्टे बाळगणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचं समोर येत आहे. याबाबत लवकरच योग्य ती कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
