प्रथिनिधी, पनवेल : महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून राष्ट्रवादीच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे,असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज पनवेल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. पालघरमधील साधूंचे हत्याकांड, मंत्री आव्हाड यांच्या बंगल्यावर करमुसे नावाच्या अभियंत्यास पोलिसांदेखत झालेली मारहाण, गोपीचंद पडळकर यांच्यावरील जीवघेणा हल्ला, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण,केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात दहशत माजविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आणि पोलिसांनी अटक केल्यानंतरही एका अभिनेत्रीस मारहाण करण्याचा प्रयत्न या सर्व घटना राष्ट्रवादीने कायदा हातात घेतल्याचे पुरावे आहेत.
शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावरील वैयक्तिक टीका असमर्थनीय आहे. पण कायदेशीर कारवाई सुरू असतानाही मारहाणीचे आदेश देणे व दहशत पसरविणे यातून राज्याची कायदा सुव्यवस्था संपविण्याचा कट उघड होतो, असेही ते म्हणाले.
