जनतेज न्युज

साताऱ्यातील महादरे जंगल ठरले “भारतातील पहिलं फुलपाखरांचं जंगल”.

प्रतिनिधी, सातारा : साताऱ्याजवळ महादरेच्या वनक्षेत्राला मुंबईत झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ‘फुलपाखरू संवर्धन राखीव’ म्हणून मान्यता मिळाली. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील हे पहिलं फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र ठरले आहे.या जंगलात बिबट्या पासून फुलपाखरांपर्यंत वन्यजीवांचा मुक्त विहार, निखळ पाण्याचे निर्झर, पाठीशी यवतेश्वरचा डोंगर, हिरवीगार जंगल झाडी, कोणालाही मोहित करावे असं महादरेचं जंगल आहे. सातारा शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर हे जंगल आहे. महादरे येथील जैवविविधता अलौकिक आहे. पश्चिम घाटात 341 प्रजातींची फुलपाखरे आढळतात. त्यापैकी 178 प्रजाती एकट्या महादरेच्या जंगलात पाहायला मिळतात. यवतेश्वर घाटाच्या मध्यापासून भैरोबा टेकडीपर्यंत सुमारे 105 हेक्टर वनक्षेत्रावर वनविभागाची मालकी आहे. तेवढ्याच क्षेत्राला संवर्धित राखीव क्षेत्राचा दर्जा मिळाल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या कोणत्याही हक्काला बाधा नाही. उलट या क्षेत्राचे संरक्षण, संगोपन आणि नैसर्गिक विकासासाठी मनुष्यबळ व आर्थिक तरतूद शासन करेल, असे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी स्पष्ट केले.किर्रर्रर्र जंगलात, पक्षांच्या किलबिलाटात, निसरड्या पायवाटा तुडवत जंगलभ्रमंती अनुभवण्याची संधी निसर्गपर्यटकांना या निमित्ताने चालून आली आहे. त्याचबरोबर स्थानिकांना गावातच रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे.